दही खाण्याचे फायदे

आरोग्य

१. पोट भरल्याचे समाधान टिकून राहते

दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

२. भरपूर प्रथिनांनी युक्त आहार

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.

३. ऊर्जेने युक्त आहार

दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि खडीसाखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते. पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

४. प्रतिकारशक्ती वाढते

दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.

५. मधुमेह नियंत्रित राहतो

दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तांगांची खाज कमी होते.

६. पचन क्रिया सुधारते​

दही पचायला हलके आहेच. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते. जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

७. हृदय विकाराची शक्यता कमी होते​

दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.

8 जीवनसत्वानी परिपूर्ण

विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवन सत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जासंस्था निरोगी राहते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.

9 आतड्यांचे आरोग्य सुधारते

लॅक्टोबॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते. आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.

10. चेहरा, त्वचा उजळते

चेहऱ्यावर, त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

१1. केसांसाठी उपयुक्त

तीस मिनिटांपर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ आणि रेशमी बनतात. मेंदी सोबत लावल्यास परिणाम आणखी वाढतो. दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो. केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने केस गळती कमी होते.

१२. मानसिक स्वास्थ्यासाठी 

दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहणेस मदत होते. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

दही: दही, चक्का, पनीर, ताक, कढी, मठ्ठा या स्वरुपात तसेच रायता, कोशंबीर, दहीवडे, श्रीखंड इत्यादीच्या माध्यमातून आहारात येते.

अगदी उंट, शेळी, म्हैस आणि गाय शिवाय इतर सर्व दुभत्या जनावरांच्या दुधाचे दही वापरले जाते. आजकाल सोयाबीन आणि नारळाच्या दुधाचे दही काही रुग्णांसाठी वापरले जाते.

(सोशल मीडियावरुन साभार)