पचनक्रिया वाढवणारे सूप

आरोग्य

अयोग्य आहार, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, बाहेरचे पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, आदी कारणांमुळे पोटाच्या तक्रारी वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोटाच्या तक्रारी टाळायच्या असतील तर वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पोट बिघडले म्हणून सतत औषध घेणे चांगले नसून त्याचे साईड इफेक्टही होऊ शकतात. अशी समस्या उद्भवल्यास घरच्या घरी उपचार करणे चांगले आहे. पचायला हलके, व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटीनयुक्त सूप घेतले तर ही समस्या सुटू शकते.

१) पालक पनीर सूप

तेलावर कांदा आणि लसूण परतून त्यावर पालकची पेस्ट टाका. थोडे किसलेले पनीर टाकून हे मिश्रण चांगले उकळवून घ्या.

२) लाल भोपळ्याचे सूप

लाल भोपळ्याचे तुकडे, कांदा, लाल मिरच्या, आले, लसूण पेस्ट, भाजलेले जिरे, हे सर्व दोन कप पाण्यात प्रेशर कूकरमध्ये १० मिनिटे हे मिश्रण शिजवा. कूकर थंड झाल्यानंतर सर्व मिश्रण भांड्यात काढून पेस्ट करा. हे सूप घेतल्यास पचनक्रिया सुधारते.

३) दालचिनी, टोमॅटो सूप

चिरलेला कांदा, टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून नंतर लसूण, अक्रोडचे काप, भाज्या टाका. एक उकळी आल्यानंतर हे मिश्रण चांगले घोटून घ्या. यामध्ये मिरपूड, दालचिनीची पावडर टाका. पिण्याअगोदर एकदा गरम केले तरी चालेल.

४) गाजर, कोथिंबिर सूप

गाजर वाफवून त्याची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये कोवळ्या कोथींबीरीचे देठ, सेलेरीचे देठ, किसलेले आले टाका आणि कोमट झाल्यावर सूप प्या.

५) लिंबू, कोेथिंबीर सूप

भाज्यांचे काप पाण्यात उकळवून त्यामध्ये मिरपूड, लवंग टाका. नंतर कोथिंबीरीची पाने व लिंबाचा रस टाका. संध्याकाळी हे सूप घेतल्यास अधिक लाभदायक ठरते.