ऊस तोडणी झाल्यानंतर पाचट व्यवस्थापन करणे गरजेचे; विजय वाबळे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): गुनाट (ता शिरुर) येथे कृषि विभागाच्या ‘पाचट जाळू नका’ या अभियानाला प्रतिसाद दिल्याने खोडवा ऊसाचे 83 टनापर्यंत उत्पादन शक्य झाल्याने पाचट व्यवस्थापन गरजेचे असल्याचे प्रतिपादन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त तज्ञ संचालक विजय वाबळे यांनी केले.

गुनाट येथे विजय वाबळे यांची शेती असुन ते दरवर्षी 6 एकर क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन करीत आहेत. पाचट व्यवस्थापन करताना कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत असुन आडसली तुटल्यानंतर 95 टन तर खोडव्याचे 83 टन एकरी ऊसाचे उत्पादन वाबळे घेत आहेत. त्यांना ऊस क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट पुणे यांनी उत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. तसेच भारतीय शुगर यांनी उत्कृष्ट कार्यकारी संचालक चा पुरस्कार दिला गेला आहे.

उस तोडणी झाल्यानंतर पाचट ठेवलेल्या शेतात कुटी मशीनच्या आधारे पाचट कुटी करून पाचट कुजून खत होण्यासाठी त्यावर 30 ते 35 किलो युरीया 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1 लिटर पाचट कुजविणारे कल्चर वापरण्यास त्यांनी सांगितले आहे. प्रति एकरी 4 टन पाचट मिळत असुन त्यात साधारणपणे 20 किलो नत्र 8 किलो स्फुरद तर 30 ते 40 किलो पालाश सह 1 ते 1.5 टन सेंद्रिय कर्ब मिळण्यास मदत होत आहे. तसेच जमिनीची सुपिकता सोबतच खोडवा ऊसाचे उत्पादन वाढीचा दुहेरी फायदा होत असल्याची माहिती कृषी सहायक जयवंत भगत यांनी दिली.तसेच गुनाट शिंदोडी चिंचणी निर्वी धुमाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना पाचट न जाळण्याचे आवाहन विजय वाबळे सह जयवंत भगत यांनी केले आहे विजय वाबळे यांच्या प्रक्षेत्रात आज शिवाजी गव्हाणे अनिल घावटे उषाताई वाबळे शेतकरी उपस्थित होते.