गणपतीत बिनधास्त खा उकडीचे मोदक; ‘या’ समस्यांवर आहे रामबाण उपाय

आरोग्य

कोणताही सण आला की भारतीय घरांमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असते. त्यातही गणेशोत्सव म्हणजे बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनणाऱ्या मेजवानीवर ताव मारण्याची चांगली संधी असते. उकडीचे मोदक, वालाचे बिरडे, पातोळ्या अशा पदार्थांची गणेशोत्सवात रेलचेल असते. आता हे इतकं सगळं खायचं म्हणजे पुन्हा वजन वाढणार, रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असेल तर पुन्हा डोक्याला ताप. या सगळ्या विचारांनी आपण जर मन मारून राहत असाल तर आजच्या या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्की आनंद होणार आहे. तुम्ही अगदी डाएटवर असाल तरी बिनधास्त उकडीचे मोदक खाऊ शकता कारण उकडीच्या मोदकातील सामग्री ही तुमच्या अनेक समस्यांवर उपाय सिद्ध होऊ शकते.

बद्धकोष्ठवर उपाय: उकडीच्या मोदकाचे सारण हे तुपात बनवले जाते व तूप हे बद्धकोष्ठवर रामबाण उपाय आहे. तसेच सारणातील नारळामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया जलद होते. मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी उकडीच्या मोदकांचा फायदा होता.

त्वचेसाठी परिणामकारी: तुपामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. व्हिटॅमिन ए, ओमेगा ३ फॅटी ऍसिड यामुळे चेहऱ्यावर तजेला येतो. तुम्हाला सतत पिंपलचा त्रास असेल तर उकडीचे मोदक खाणे नक्कीच परिणामकारी सिद्ध होते.

रक्तदाबावर नियंत्रण: उकडीच्या मोदकातील पोषक तत्त्वांमुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. यामुळे हृदयाच्या नसांवरील तणाव कमी होऊन रक्तदाब सुरळीत होण्यात मदत होते.

ग्ल्यायस्मिक इंडेक्स कमी: मोदक हा तांदूळ, खोबरं, गूळ यांच्या मिश्रणाने बनवलेला असतो. मोदकाचा ग्ल्यास्मिक इंडेक्स कमी असतो. उकडीच्या मोदकाचे प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये झटकन चढ- उतार होण्याचा धोका टळतो.

पोटातील जळजळीवर आराम: तांदळाच्या पिठात व्हिटॅमिन बी 1 आणि साखर असते ज्यामुळे तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा कमी होते. कार्बोहायड्रेट आणि फायबरमुळे जर तुम्हाला अपचन, पोटात जळजळ असे त्रास असतील तर त्यावर आराम मिळतो.

हाडांची मजबुती: मोदकाच्या सारणात वापरले जाणारे खोबरे व सुका मेवा यात मॅंगनीजचे प्रमाणही जास्त असते जे निरोगी हाडांसाठी आवश्यक असते.

(सोशल मीडियावरुन साभार)