लस म्हणजे नक्की काय…?

आरोग्य

अनेकदा लस, लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय? या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते. बर्‍याचदा आपण बघतो की, उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही.

नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला, तर त्याच्या पोटात दुखते, जुलाब लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली, तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात, किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले, तर त्यांना मारुन टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करुन घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करु शकत नाहीत. पण त्यांच्या विरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात.

लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये, म्हणून लसीकरण करत, अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले. आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत.

(सोशल मीडियावरुन साभार)