पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

महाराष्ट्र

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाने कारवाई केली आहे. रेश्मा पारधी असे संबंधित सेविकेचे नाव असून, त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

रेश्मा पारधी यांनी अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवत व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. शासकीय जागेचा आणि पदाचा गैरवापर करून व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मात्र, लहान मुलांच्या आरोग्याचा आणि त्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप पारधी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव यांनी सांगितले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी किंवा समस्या मांडताना शासनाने निश्चित केलेल्या नियमावली आणि आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेला सेवेतून कमी करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाले असून, त्यामुळे या प्रकरणावर अधिक भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संबंधित सेविकेला या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची संधी असल्याचेही जाधव यांनी सांगितले. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार लॅब टेस्टेड असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तसेच, रेश्मा पारधी यांनी शासकीय नियमांचा भंग केल्याबद्दल माफी मागणारा अर्ज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केल्यास सेवेतून कमी करण्याचे आदेश रद्द होऊ शकतात, अशी माहितीही जाधव यांनी दिली.

पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेविकेवरच कारवाई झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आहाराच्या दर्जाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणार का आणि सेविकेवरील कारवाईचा पुनर्विचार केला जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत