२५ कोटींचा अतिवृष्टी अनुदान महाघोटाळा! सरकारी बाबूच बनले ‘शेतकरी’, ३१ जणांना अटक

महाराष्ट्र

जालना: नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेली सरकारी तिजोरीच लुटल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार करण्यात आल्याप्रकरणी ३१ आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घोटाळ्यात चक्क तलाठी, तहसील कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा सहभाग असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

अतिवृष्टीचा बहाणा, संगनमताचा कट

जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने जाहीर केलेले अनुदान गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने मोठा आर्थिक कट रचला.

ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा व्यक्तींची नावे बनावट नोंदीद्वारे लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड चोरून प्रणालीत फेरफार करण्यात आला. घोटाळा उघड होऊ नये म्हणून कागदोपत्री व डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

आर्थिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच आरोपी भूमिगत होण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत ३१ आरोपींना अटक केली.

न्यायालयाचा दणका; जामीन फेटाळला

आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तपास यंत्रणेकडील ठोस पुरावे आणि घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले.

मालमत्ता जप्त, बँक खाती सील

या प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून ३१ जण कोठडीत आहेत. उर्वरित ४ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली, काहींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात आला आहे. मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

आरोपींची विभागवार संख्या

तलाठी : २२

तहसील कर्मचारी : ५

जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी : १

संगणक ऑपरेटर व नेटवर्क इंजिनिअर : समावेश

अंबड व घनसावंगी तहसीलमध्ये लॉगिन-पासवर्डचा गैरवापर करून हा कोट्यवधींचा अपहार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. “कोणालाही सोडले जाणार नाही”, अशी ठाम भूमिका आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी व्यक्त केली आहे.