PMRDA अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच…

महाराष्ट्र

मांजरी: मांजरी बुद्रुक येथील सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही PMRDA अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. रविवार (दि. 11) रोजी संध्याकाळी झालेल्या पावसात रस्त्याच्या अर्धवट कामात वाहने अडकून अपघात घडले. अनेकजण जखमी झाले, तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

PMRDA कडून मांजरी बुद्रुक रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम केले जात आहे. हे काम करताना वाहतूक सुरक्षेची आजिबात काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. धोक्याच्या सूचना, सिग्नल, रिफ्लेक्टर, सेवा व पर्यायी रस्त्याचे फलक लावलेले नाहीत. प्रवासी व नागरिकांनी वारंवार निदर्शनास आणूनही अधिकारी व ठेकेदारांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे दररोजच या मार्गावर छोटेमोठे अपघात होत आहेत.

अधिकाऱ्यांकडून त्या-त्या वेळी काळजी घेण्याचे अश्वासन दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात सुरक्षीत वाहतुकीची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी अपघातात याच निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा बळी गेल्याची तक्रार नागरिक करत आहेत. काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसात रस्त्याच्या अर्धवट कामात अनेक वाहने अडकून अपघात घडले. यात अनेकजण जखमी झाले याशिवाय चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

रस्त्याचे काम करीत असताना वाहतुकीच्या सुरक्षेबाबत विविध माध्यमातून वारंवार कल्पना देऊनही ठेकेदार व अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. वाहतूक पोलिसांनीही याबाबत निष्काळजीपणा दाखविल्याने काल झालेल्या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. संबंधीत सर्वांना या घटनेस जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे राजेंद्र साळवे, यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठाण हवेली तालुका अध्यक्ष अशोक आव्हाळे, तंटामुक्त समितीचे हवेली तालुका माजी अध्यक्ष विकास गायकवाड पाटील यांनी केली आहे.