कल्याण रेल्वे अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

महाराष्ट्र

कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चाकू व कटरचा धाक दाखवून अत्याचार झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच म्हणतात की, ‘महिलांचा अधिकार म्हणजेच महिलांचा सन्मान!’ त्यांच्या याच भूमिकेनुसार राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकारकडून खंबीरपणे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीत पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले.

घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग मुंबई गुन्हे शाखेच्या पथकांनी अवघ्या पाच तासांत तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी सौरभ संतोष सोनवणे (वय २१, रा. परशुरामवाडी, कल्याण पूर्व) याला १७ मे रोजी अटक केली.

बैठकीदरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील उर्वरित पॉक्सो न्यायालये तातडीने सुरू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. राज्यात मंजूर झालेल्या १४० पॉक्सो न्यायालयांपैकी ३८ न्यायालये सुरू झाली असून उर्वरित न्यायालये न्यायाधीश उपलब्ध होताच कार्यान्वित करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व पायाभूत सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

घटना ज्या मोडकळीस आलेल्या रेल्वे इमारतीत घडली, अशा रेल्वे हद्दीतील सर्व धोकादायक व पडक्या इमारती तातडीने पाडण्याची कारवाई करावी, तसेच रेल्वे यार्ड परिसरात सर्चलाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या.

कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांना दिले. रेल्वे पोलीस आणि राज्य पोलिसांनी संयुक्त गस्त वाढवून “महिला दक्षता समित्या” स्थापन कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी पीडित कुटुंबाला सामाजिक आधार देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. कल्याणचे शिवसेना आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, नगरसेविका विजया पोटे, अस्मिता मोरे, माया कांबळे, दर्शना काळे, अनघा देवळेकर, प्रमिला पाटील उपस्थित होत्या. तसेच जिल्हा संघटिका छायाताई वाघमारे, संपर्क संघटक कविता गावंड, शहर संघटक पुष्पा ठाकरे, महानगर संघटक स्वाती मोहिते, उपशहर संघटक कृष्णा आव्हाड आणि शिवसेना पदाधिकारी राणी कपोते यांचीही उपस्थिती होती.

पीडित मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या आईची भेट घेऊन तिला धीर दिला. तसेच राज्य शासनाच्या “मनोधैर्य” योजनेतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीही ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत