मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.अजित दादा पवार हे स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते प्रभावीपणे सोडवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात होते. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात ठामपणा दिसून येत असे, असेही सपकाळ यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित दादांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे काका, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडून मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत अजित दादांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. कामाच्या बाबतीत ते अत्यंत स्पष्ट, वक्तशीर, कणखर आणि निर्णयक्षम होते. कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो, त्याच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत.
आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी आमदार, खासदार, विविध खात्यांचे मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. प्रत्येक पदाला त्यांनी पूर्ण न्याय दिला. राजकारणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, कला आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.बारामतीसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करून त्यांनी या भागांचा चेहरामोहरा बदलला. सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजेत, हीच त्यांची कायम भूमिका होती. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता.
अजित दादा पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी संस्थात्मक बांधणी केली, नेतृत्वाची पुढील पिढी घडवली आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर विशेष भर दिला. विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते.त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी राजकीय हानी झाली आहे. स्व. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाप्रमाणेच अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.