ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झाले असताना मंत्रिमंडळात असलेले छगन भुजबळ यांनी केवळ भूमिका मांडण्याऐवजी रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

ओबीसी समाजाचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या जागा कमी झाल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेल आणि शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत. स्वाधार योजनेचा लाभ मिळत नाही, तसेच ओबीसी महामंडळाच्या योजनांचाही अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे ओबीसी समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याचे ते म्हणाले.

‘भुजबळांनी सरकारला जाब विचारावा’

मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत ओबीसींचे आरक्षण आणि सवलती संपत असतील, तर त्यांनी रस्त्यावर उतरून समाजाच्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला पाहिजे. अन्यथा मंत्रिमंडळात राहून या पापाचे वाटेकरी ओबीसी नेते ठरतील, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

सरकारमधील ओबीसी नेत्यांनी समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली नाही, तर समाज त्यांना माफ करणार नाही. केवळ मंत्रिमंडळात राहून ओबीसी समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी संघर्ष करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटीच्या साखळीची चौकशी करा

राज्यात पेपरफुटीच्या शेकडो घटना घडल्या असून, त्याचा फटका गरीब आणि कष्टकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. पैसा असणाऱ्यांना संधी मिळते, तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

पेपरफुटी ही यंत्रणेतील व्यक्तींच्या सहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे सरकारने केवळ वरवरची चौकशी न करता पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करावी. मंत्रालयातील अधिकारी ते आयोगातील अधिकारी, या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

डीजेवरून सत्ताधाऱ्यांची दुटप्पी भूमिका

गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा झाला पाहिजे; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि कायद्याचे उल्लंघन होता कामा नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

डीजेच्या वापराबाबत पुणे आणि नागपूरमध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्याही भूमिका परस्परविरोधी आहेत. पुणे आणि नागपूरचे पोलीस आयुक्त वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. नागपुरात भाजपचे दोन गट पडले असून, एक गट डीजे वाजवण्याची भूमिका घेत आहे, तर दुसरा गट डीजेला विरोध करत आहे. ही दुटप्पी भूमिका असून, यातून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

“कायदे अस्तित्वात असताना ते पाळण्यापासून सरकारला कोणी रोखले आहे? कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई करा,” असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

लेझरचा वारेमाप वापर नागरिकांसाठी त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सरकारने स्पष्ट आणि समान नियम लागू करावेत. उत्सव उत्साहात साजरा करा; मात्र धांगडधिंगा नको आणि कायद्याचे उल्लंघनही नको, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत