लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा हप्ता लवकरच खात्यात; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्र

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, जुलै महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेल्या महिलांसाठी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जुलैच्या हप्त्यासाठी 344.74 कोटींचा निधी

लाडकी बहीण योजनेच्या जुलै 2026 महिन्याच्या आर्थिक लाभासाठी महाराष्ट्र सरकारने 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या वितरणास शासनाने मान्यता दिली असून, आगामी काळात पात्र महिलांना हा निधी वितरित केला जाणार आहे. मात्र, याबाबत महिला आणि बालविकास विभागाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

15 ऑगस्टपूर्वी पैसे मिळण्याची शक्यता?

जुलै महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आल्याने लवकरच हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना फटका

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आल्यानंतर अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या मोठ्या संख्येने लाभार्थींना योजनेच्या लाभातून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे.

योजना बंद होणार का?

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने योजना बंद होण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, सरकारकडून ही योजना बंद केली जाणार नसल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र महिलांना आगामी काळात नियमित हप्ते मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत