ठाणे: ठाण्यातील प्रसिद्ध ‘गौरव स्वीट्स’ या मिठाई दुकानाबाहेरील स्टॉलवर महापालिकेमार्फत कारवाईची भीती दाखवत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सुशांत सुर्वे आणि त्याच्या सहकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सुर्वे याचा यापूर्वीही लाचलुचपत प्रकरणाशी संबंध आला होता. ठाणे महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संबंधित लाच प्रकरणात त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा खंडणीचे प्रकार सुरू ठेवल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात अक्षय करंजवकर हा नोव्हेंबर २०२५ मध्ये मानपाडा येथील कॉसमॉस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात गेला होता. त्याने स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगत दुकानाबाहेर स्टॉलमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा केला. तसेच छायाचित्रे काढून महापालिकेत तक्रार करण्याची धमकी दिली.
यानंतर “दरमहा पैसे द्या, अन्यथा कारवाई करायला लावू” अशी धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली. दुकान मालक पटेल यांनी नकार दिल्यानंतरही आरोपींनी तक्रारीचा पाठपुरावा सुरू ठेवला. पुढे १८ फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे याने पटेल यांना फोन करून तडजोडीचा प्रस्ताव दिला.
सुरुवातीला पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर दोन लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले. याबाबत पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार, गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले आणि सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील यांच्या पथकाने १३ मार्च रोजी वसंत विहार परिसरात सापळा रचला. आरोपी दोघे दोन लाख रुपये स्वीकारण्यासाठी वसंत विहार चौकात आले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली.
दरम्यान, सुशांत सुर्वे याच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप असून, कारवाईनंतरही त्याने खंडणीचे सत्र सुरू ठेवल्याने त्याला कोणाचा पाठिंबा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.