गांधीजींच्या मंत्राचा केंद्राला विसर मात्र आपण ती चूक करु नये; जयंत पाटील

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करु नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

दरम्यान गांधीजींचा एक मंत्र ट्वीट करत आपल्यातला ‘अहं’ विसराल असे सुचवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पासाठी राज्यातील जनतेकडून कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत त्यावर जयंत पाटील यांनी माजी अर्थमंत्री म्हणून गांधीजींचा मंत्र अंमलात आणायला सांगितला आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट केलेला गांधीजींचा मंत्र… “मी तुम्हाला एक कल्पना देतो. जेव्हा आपल्याला शंका असेल, ‘अहं’ बळावत असेल तेव्हा खालील चाचणी करा.”तुम्ही नजीकच्या काळात पाहिलेल्या सर्वात गरीब आणि दुर्बल माणसाचा चेहरा आठवा. स्वतःला विचारा की, तुम्ही करणार असलेली कृती त्यांच्या उपयोगाची आहे का? त्यातून त्यांना काही फायदा होणार आहे का? या निर्णयामुळे त्यांना त्यांच्या जीवनावर नियंत्रण मिळवता येणार आहे का? दुसऱ्या शब्दांत मांडायचे झाले तर भुकेलेल्या लाखो लोकांना स्वराज्य मिळणार आहे का? या प्रश्नांचे उत्तर गवसल्यानंतर तुमच्या शंका दूर होतील आणि तुम्ही ‘अह’ विसराल.