महिला अग्निशमन दलाच्या भरतीमधे गदारोळ, भरतीसाठी आलेल्या मुलींवर लाठीचार्ज…

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईतील दहिसर पश्चिम येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे मैदानावर महिला अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची भरती सुरु होती. जिथे रात्रीपासून महिला जमा झाल्या होत्या आणि त्याच ठिकाणी भरतीची तयारी करत होत्या. मात्र सकाळी मुलींना गेटमधून आत जाऊ दिले नाही. त्यानंतर मुलींनी बीएमसी हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

घोषणाबाजी दरम्यान पोलिस आणि तरुणींमध्ये बाचाबाची झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून या मुली जमल्या होत्या. या भरतीबाबत मुलीनी भेदभाव होत असल्याचा व ही भरती नव्याने होण्याची मागणी करत आंदोलन केले. मैदानात प्रवेश न मिळाल्याने मुली मैदानाचे दुभाजक ओलांडून आत प्रवेश करत होत्या.

त्यावेळी गदारोळ झाला,पोलीसांनी लाठीचार्ज केला,यात काहीजणी जखमी झाल्याचे मुलीनी सागितले. ही अत्यंत धक्कादायक व गंभीर बाब असून मुलीवर झालेल्या लाठीचार्ज ची चौकशी व्हायला हवी आणि नियोजनबद्ध रित्या पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया व्हावी, अशी मागणी मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधान परिषद उपसभापती मा डॉ नीलम गोऱ्हे व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार शीतल करदेकर यांनी ट्विटर व्दारे केली आहे.

बेरोजगारीने त्रस्त तरूणाईला काम हवय आणि नोकरी देताना भरती प्रक्रियेत धांदली व महिलावर लाठीचार्ज होत असेल तर ते अत्यंत धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.