छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधात खा. जलील यांची उपोषणाला सुरुवात

महाराष्ट्र

नामकरण समर्थनात मनसेची स्वाक्षरी मोहीम..

औरंगाबाद: एकीकडे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज टीव्ही सेंटर येथे स्वाक्षरी अभियान राबविले.

या अभियानात खांबेकर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर असे या शहराचे नामकरण व्हावे, अशी मनोमन इच्छा सामान्य नागरिकांची होती, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सामान्य नागरिकांचे मन ओळखून शहराचे नामकरण केले. असे असताना खासदार इम्तियाज जलील मात्र जनतेविरुद्ध आंदोलन करीत असल्याचे दिसते. जलील यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध का आहे? हे त्यांनी स्पष्ट करावे. औरंगजेबाचे नाव त्यांना खूपच प्रिय असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांचे नावे औरंगजेब ठेवावे, त्यास आमच्या विरोध नाही, मात्र छत्रपती संभाजी नगर या नावाला विरोध कराल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खासदार जलील यांच्याविरुद्ध यापुढेही आंदोलन करील, असा इशारा त्यांनी दिला.

जलील यांचे उपोषण

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णया विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो नागरिकांनी साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. यावेळी ‘आय लव औरंगाबाद’ नावाचे फलक घेऊन अनेकजण या उपोषणात सहभागी झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान राजकारणासाठी शहराचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला आहे.