मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात काढणार धनुष्यबाण यात्रा

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमधून होणार यात्रेची सुरुवात

औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे.

कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ‘धनुष्यबाण यात्रे’ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच होणार आहे. आठ किंवा 9 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर ‘राजकारणाचा केंद्रबिंदू’ बनतोय…

राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे नेहमीच महत्वाचे स्थान राहिले आहे. राज्यातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडींचा अनेकदा उगमस्थान छत्रपती संभाजीनगर ठरतो. त्यातच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत सर्वाधिक पाच आमदार छत्रपती संभाजीनगरमधूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले होते. तर मंत्रिमंडळात देखील सर्वाधिक तीन मंत्रिपद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाले आहेत.

त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडून राज्यभरात एकत्रित होणाऱ्या सभांची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगरमधूनच होत आहे. तर याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेची सुरवात देखील याच शहरातून होणार आहे.