चाल बांधून त्यात शब्द बसवण्यापेक्षा शब्दाना समर्पक चाल लावणं आवडते; अवधूत गुप्ते

महाराष्ट्र

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दहिसर शाखेने, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘कलावंत आपल्या भेटीला’ ही मालिका सुरू केली. या मालिकेचे चौथे पुष्प सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार,निर्माते अवधूत गुप्ते यांच्या मुलाखतीच्या रूपाने गुंफले गेले. सुप्रसिद्ध निवेदिका व एकेकाळी त्यांच्याच शिक्षिका असणाऱ्या शोभा नाखरे यांनी ही मुलाखत उत्तरोत्तर विलक्षण रंगवत नेली.

आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळते आहे, हे माझे सुदैव आहे अशी भावना अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली. ‘ऐका दाजीबा’ हे आपण लिहिलेले पहिले गाणे असल्याचे त्यांनी सांगितले. चाल बांधून त्यात शब्द बसवण्यापेक्षा शब्दाना समर्पक चाल लावणं आवडते. कोरोना काळात केलेले ‘सूर नवा ध्यास नवा’ चे काम आव्हानात्मक होते. तेव्हा दोनशे जणांच्या चमूला तीन वेगवेगळ्या शहरात नेऊन चित्रीकरण करताना जो आटापिटा करावा लागला, त्यामुळे निर्मात्यांचे महत्त्व पटले असे ते म्हणाले. वेगवेगळ्या पक्षांसाठी काम करताना हल्लीच्या राजकारणी माणसांची परिपक्वता जाणवली, असे अवधूत गुप्ते पुढे म्हणाले. आपल्या काही कविता ही त्यांनी सादर केल्या.

या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीची पूर्वकल्पना आल्याने म.हा.बो. पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम-स्थळ बदलण्याची विनंती केली होती. सचिन पाटील यांनी अगदी आयत्या वेळी मोठे सभागृह मिळवून दिले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांनी ग्रंथ संग्रहालयाची माहिती दिली व उपस्थितांचे स्वागत केले, सदस्य हेमंत मानकामे यांनी खुसखुशीत प्रास्ताविक केले. प्रवीण लाडे यांनी केलेल्या हृद्य आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमात दहिसरमधील ज्येष्ठ संगीतशिक्षकांचा संगीतभुषण या पदवीनेअवधुत गुप्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहिसरकरांच्यामनात दीर्घकाळ लक्षात राहील, असा देखणा कार्यक्रम झाला.दर्दी रसिकांची प्रचंड गर्दी या कार्यक्रमास झाली होती.