पुण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

क्राईम महाराष्ट्र

पुणे : बिबवेवाडी परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बालविकास प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका स्वाती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइन १०९८ कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा उलगडा झाला.

सुपरवायझर मोनिका जाधव आणि संबंधित पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मुलीचा विवाह झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळेचा दाखला तपासण्यात आला असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला.

या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९, १० आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची भूमिका तपासण्यास सुरुवात केली असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत