बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक

मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल 89.79 टक्के लागला असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेत एकूण 14,44,713 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मंत्री भुसे म्हणाले की, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून त्यांच्या यशामागे पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. या यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रगती करून राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे.

ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने अभ्यास करून पुढील संधींचा फायदा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. जून-जुलैमध्ये पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निकालाची वैशिष्ट्ये :

एकूण निकाल : 89.79%

कोकण विभाग अव्वल : 94.14%

पुणे : 91.25%

अमरावती : 90.92%

नाशिक : 90.72%

मुंबई : 90.08%

कोल्हापूर : 89.97%

छत्रपती संभाजीनगर : 88.68%

नागपूर : 88.67%

लातूर : 84.14%

मुलींची सरशी :

मुलांची उत्तीर्णता 86.80% तर मुलींची 93.15% असून मुली 6.35% ने आघाडीवर आहेत.

श्रेणी वितरण :

प्रावीण्यासह : 1,42,697

प्रथम श्रेणी : 3,62,033

द्वितीय श्रेणी : 5,81,519

उत्तीर्ण : 2,00,594

गुणसुधार संधी :

विद्यार्थ्यांना श्रेणी/गुण सुधारण्यासाठी पुढील तीन परीक्षांमध्ये (जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027, जून-जुलै 2027) संधी उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत