मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, देशात सध्या मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी थेट लढाई सुरू असून या संघर्षात अनुसूचित जाती समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मागील काही वर्षांत लोकशाही संस्थांवर आणि संविधानिक मूल्यांवर आघात होत असल्याचा आरोप करत त्यांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना सपकाळ यांनी संघटनेच्या कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केले. देशासमोरील आव्हाने लक्षात घेऊन संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संविधानविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाच्या मुद्द्यावर देशभर जनजागृती करून भाजपचा डाव उधळून लावल्याचा दावा त्यांनी केला.
वनकर यांनी पुढे सांगितले की, संविधानाला असलेला धोका अद्याप संपलेला नसून दलित आणि अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सजगपणे काम करण्याची गरज आहे. मतदार यादीतील नावांबाबतही दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.कार्यक्रमात माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. नव्या जबाबदारीसाठी अनिरुद्ध वनकर यांचे अभिनंदन करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.