मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेच्या आवाहनाला प्रतिसाद देताना काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी, “कधी आणि कुठे यायचे ते सांगा, तसेच चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आणा,” असे प्रतिआव्हान दिले.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार शोभाताई बच्छाव यांनी भाजपावर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर “खोटा राजकारण” केल्याचा आरोप केला. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक सर्वसंमतीने मंजूर झाले होते, मात्र भाजपाने त्यात जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या अटी घालून अंमलबजावणी लांबवली. काँग्रेसने विद्यमान ५४३ लोकसभा जागांपैकीच ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली होती, पण ती फेटाळण्यात आली.
भाजपाने विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत शिंदे यांनी म्हटले की, “या माध्यमातून देशात प्रादेशिक फूट पाडण्याचा डाव होता, जो विरोधकांनी हाणून पाडला.”
दरम्यान, खासदार शोभाताई बच्छाव यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत सांगितले की, माजी पंतप्रधान Rajiv Gandhi यांनी पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले, तर Sonia Gandhi यांच्या नेतृत्वाखाली ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. “आज देशभरात लाखो महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत, हे काँग्रेसच्या धोरणांमुळेच शक्य झाले,” असे त्यांनी नमूद केले.
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही भाजपावर निशाणा साधत प्रणिती शिंदे यांनी मणिपूर, हाथरस, उन्नाव यांसारख्या घटनांचा उल्लेख केला आणि “महिलांच्या सुरक्षेबाबत भाजपाची भूमिका संशयास्पद आहे,” अशी टीका केली.काँग्रेसने महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट भूमिका घेतली असून, या विषयावर थेट आणि सार्वजनिक चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.