मुंबई: केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका करत या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने गुरुवारी (१२ मार्च) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढीबरोबरच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आला असून अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. काही ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आल्याचेही सांगितले जात आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे गॅस व इंधन पुरवठ्याचे योग्य नियोजन नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आखाती भागातील युद्धपरिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असले तरी गॅसचा तुटवडा नसल्याचा सरकारचा दावा चुकीचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत असून हॉटेल व खानावळ व्यवसायिकांनाही सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत.
एलपीजी दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना गॅस सिलेंडर सहज उपलब्ध करून द्यावेत, या मागण्यांसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, विविध सेल व विभागांचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी दिली.