श्रीरामपूरची ४००० एकर जमीन ‘शेल कंपनी’ला देऊ नका; खुल्या लिलावाची वडेट्टीवारांची मागणी

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे ४००० एकर बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग या कंपनीला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी बुधवारी विधानसभेत केला. लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्य शेती महामंडळाची मौल्यवान जमीन अशा कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे ज्याच्या कामकाजात आणि आर्थिक व्यवहारांत अनेक गंभीर त्रुटी आढळतात. ZR2 ग्रुप होल्डिंग आणि ZR2 बायोएनर्जी या कंपन्यांमध्ये जिमी ओल्सन आणि सुनील कलापुरे हे संचालक आहेत. हे दोघेही महाराष्ट्रातील एका मंत्र्यांशी संबंधित संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्यामुळे या व्यवहारात राजकीय हितसंबंध असल्याचा संशय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

कंपनीच्या ताळेबंदात मोठी विसंगती असल्याचाही आरोप त्यांनी केला. २०२४ मध्ये अवघ्या दीड कोटी रुपयांच्या आसपास विक्री दाखवणाऱ्या कंपनीने ३० कोटींचा नफा दाखवला आहे. तसेच २०२५ मध्ये अचानक १०० कोटी रुपयांची भांडवली वाढ दाखवण्यात आली असून हा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा दावा त्यांनी केला.

ही जमीन शेतकऱ्यांची हक्काची असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ती या कथित बोगस कंपनीला देऊ नये, अशी मागणी करत वडेट्टीवार म्हणाले की, ही जमीन एमआयडीसीमार्फत या कंपनीला देण्याचा डाव रचला जात आहे. यासाठी उद्योग विभागाने जीआरमध्येही बदल केल्याचा आरोप त्यांनी केला.

श्रीरामपूर येथील ही जमीन खुल्या लिलावात विकली तर सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. सुमारे सहा हजार कोटी रुपयांची ही जमीन एका मंत्र्यांच्या फायद्यासाठी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.यावर उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी सांगितले की, या जमिनीबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेतला जाईल. जमीन कोणत्याही चुकीच्या पद्धतीने विकली जाणार नाही आणि या प्रकरणी बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.