कुंडल: कुंडल जिल्हा परिषद गटात काँग्रेसने मोठा राजकीय धक्का देत भाजपला पराभवाचा सामना करायला लावला आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश महेंद्र लाड यांनी भाजपच्या धनश्री शरद लाड यांचा पराभव करत लक्षवेधी विजय मिळवला.
मागील निवडणुकीत धनश्री लाड यांचे पती व भाजप नेते शरद लाड यांनी ऋषिकेश लाड यांचे वडील महेंद्र लाड यांचा पराभव केला होता. त्याच पराभवाचा वचपा या निवडणुकीत काँग्रेसने काढल्याची भावना समर्थकांमध्ये दिसून आली.
कुंडल जिल्हा परिषद गट आणि बांबवडे पंचायत समिती गणात निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. मात्र निकाल काँग्रेसच्या बाजूने झुकला. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांचे पुत्र ऋषिकेश लाड तब्बल ५,४१७ मतांनी विजयी झाले. तर बांबवडे पंचायत समिती गणात काँग्रेसच्या सुवर्णा पांडुरंग संकपाळ यांनी १,८९२ मतांनी विजय मिळवला.
मतमोजणीदरम्यान घोगाव आणि कुंडल भागातून ऋषिकेश लाड यांना आघाडी मिळण्यास सुरुवात झाली होती. हे मताधिक्य शेवटपर्यंत कायम राहिले.
ऋषिकेश महेंद्र लाड (काँग्रेस): १६,४४५ मते
धनश्री शरद लाड (भाजप): ११,०२८ मते
पंचायत समिती गणातही काँग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले.
सुवर्णा पांडुरंग संकपाळ (काँग्रेस): ७,८२७ मते
सुनंदा पोपट संकपाळ (भाजप): ५,९३५ मते
आंधळी, मोराळे, बांबवडे, कुंडल, घोगाव आणि सांडगेवाडी परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिवंगत भगिनी भारती यांच्या निधनानंतर भाचे ऋषिकेश लाड यांच्या पहिल्याच निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती, आणि त्यातच काँग्रेसला मोठे यश मिळाले.