पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून एक तज्ञ समितीची स्थापना करणे गरजेचे आहे, असे काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत पतसंस्थांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी ते म्हणाले की, पतसंस्था ही चळवळ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पतपुरवठा करणारी एक महत्वाची चळवळ आहे. सर्वसामान्य माणसांच्या विकासाची व प्रगतीची ही चळवळ आहे. यात एका विचाराची माणसे एकत्र येत पतसंस्था सुरु करतात, त्यात पैसे ठेवतात व गरजुंना कर्ज स्वरुपात वाटप करतात. त्यामुळे उद्योगालाही मोठी चालना मिळते. पतसंस्थांच्या बाबतीत तज्ञ समिती नेमून या समितीवर सदस्य म्हणून सहकार व आर्थिक क्षेत्रातील माहिती असणार्‍या तज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी. या समितीमार्फत पतसंस्थांबाबत महत्वाच्या सूचना व निर्णय घेणे गरजेचे आहे. यामुळे निर्माण होणार्‍या अडचणी कळतील व त्यावर तातडीने उपाययोजना करता येतील.

सदर समितीने पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण देणे, ऑडीटचा दर्जा देतांना योग्य तपासणी व निकष आहे की नाही याची पडताळणी करणे गरजेचे आहे. यासाठी ही तज्ञ समिती काम करेल व कामकाजात पारदर्शकता वाढेल. या सर्व गोष्टींवर सरकारने लक्ष घालून निर्णय घेणे अपेक्षित आहे.