कापसाचे दर लवकरच वाढणार; आंतरराष्ट्रीय बाजारात आली तेजी…

महाराष्ट्र

औरंगाबाद: मागील वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली. मात्र, फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच, कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची तेजी वाढली आहे, देशातल्या कापसालाही बांगलादेशातून मोठी मागणी होत आहे. तसेच चीनकडूनही कापूस खरेदीसाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे या आठवड्यात कापूस बाजाराने काही उभारी घेतल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून ८ हजारांवर असलेला कापूस बाजार भाव आता ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.

विदर्भातील कापसाचे पंढरी समाजाला जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कापसाचा भाव ८ हजार ३१५ पासून ८ हजार ८५० इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी बघता, यंदा कापसाचा सरासरी दर ८,५०० ते ९,५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.