सुनेत्रा वहिनींवर टीका म्हणजे महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान; काँग्रेसने आधी स्वतःचा इतिहास पाहावा; धनंजय मुंडे

महाराष्ट्र

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेचा आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत समाचार घेतला. सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करून काँग्रेसने महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दलचा आपला द्वेषच दाखवून दिला असल्याचा आरोप त्यांनी केला.

स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी कठीण परिस्थितीत जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्या दिवस-रात्र काम करत आहेत, असे मुंडे म्हणाले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी ‘गुंगी गुडिया’ अशी टीका सहन करावी लागली होती. मात्र त्यांनी कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध केले. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारही जनतेच्या हितासाठी मोठे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बीड दौऱ्यादरम्यान झालेल्या वादावर बोलताना मुंडे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद नसून केवळ निवेदन असल्याची माहिती प्रशासनाने आधीच लेखी दिली होती. काही पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर आपण त्यांना ही बाब सांगितली; मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.

शेतकऱ्यांना दम दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. जनता संवादादरम्यान अनेक जण एकाच वेळी बोलत असल्याने शांतपणे मते मांडण्याचे आवाहन केले होते, त्यालाच चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे ते म्हणाले.

बीडमधील काही पत्रकारांकडून सातत्याने ‘मीडिया ट्रायल’ होत असल्याचा आरोप करत मुंडे म्हणाले की, ९५ टक्क्यांहून अधिक पत्रकार चांगले काम करतात; मात्र काही मोजक्या लोकांकडून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सततच्या खोट्या बातम्या आणि बदनामीमुळे आपण वैतागलो असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका करत, NEET आंदोलनात राजकीय संधी शोधणाऱ्या काँग्रेसने झारखंडमधील पेपरफुटीवर आंदोलन का केले नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच, आपल्यावरील आरोप न्यायालयात टिकले नसतानाही आरोप करणाऱ्यांना माध्यमांकडून प्रश्न विचारले जात नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राजकीय भूमिकांवर टीका स्वीकारू; मात्र माझ्या मातीची आणि माझ्या प्रतिमेची बदनामी आता सहन करणार नाही, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत