दुःखाच्या सावटात ऐतिहासिक शपथ! शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, सुनेत्रा पवार यांच्या नावाची पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने एकमुखाने त्यांची गटनेतेपदी निवड केल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता राजभवनात शपथविधी पार पडला. मात्र, दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे हा शपथविधी अत्यंत साध्या स्वरूपात आणि दुःखाच्या सावटात झाला.

शपथविधी इतक्या घाईघाईने का पार पडला, विधिमंडळ पक्षाची बैठक तातडीने का बोलावण्यात आली, असे प्रश्न राज्यभर चर्चिले जात होते. या सर्व प्रश्नांना शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिले. दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच आपला खरा आधार असल्याचे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना भावना व्यक्त करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आज शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी काम करण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून ही जबाबदारी स्वीकारत आहे.”

दादांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे हित, युवकांच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देणे, तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

शेवटी, महाराष्ट्रातील जनतेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानत, त्यांनी दिलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला.