मुंबईत झाडं पडतात की प्रशासन? आयुक्त-महापौरांच्या वादात मुंबईकरांचा जीव धोक्यात; अमोल मातेले

महाराष्ट्र

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील आयुक्त आणि महापौर यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. २०२१ ते २०२६ या कालावधीत मुंबईत झाडे पडण्याच्या घटनांवरून सुरू असलेल्या वादात प्रशासनातील समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आयुक्त नैसर्गिक कारणांचा दाखला देत असताना महापौर सिमेंट काँक्रीटीकरणामुळे झाडे पडत असल्याचे सांगत आहेत. मात्र, जर काँक्रीटीकरणच कारण असेल, तर त्याला मंजुरी देताना सत्ताधाऱ्यांनी काय भूमिका घेतली होती, असा सवाल मातेले यांनी उपस्थित केला.

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांमध्ये झाडांच्या बुंध्यांपर्यंत सिमेंट टाकून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे अनेक जुनी झाडे गुदमरून कमकुवत झाली असून, याकडे उद्यान विभाग आणि रस्ते विभागाने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले.पावसाळ्यापूर्वी झाडांच्या छाटणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही पहिल्याच पावसात झाडे उन्मळून पडत असल्याने या कामांच्या गुणवत्तेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ज्या कंत्राटदारांनी नियमांचे उल्लंघन करून झाडांच्या बुंध्यांपर्यंत काँक्रीटीकरण केले आहे, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मातेले यांनी केली. तसेच आयुक्त आणि महापौरांनी परस्परांवरील आरोप थांबवून मुंबईकरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत