मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मात्र, या घटनेचे राजकीय भांडवल करणे त्याहून अधिक दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात व्यक्त केले. शिवसेना पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश घटना घडल्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आपल्याकडे पाठवला असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. पूर्णेकर हत्या प्रकरणाशी आपले नाव वारंवार जोडले जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याची भावना त्यांनी राजीनाम्यात व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेशी आपले नाव जोडले जात असल्यामुळे त्यांनी आपल्या भावना मांडत हा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही’
पूर्णेकर हत्या प्रकरणावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, या घटनेतील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, शस्त्रही जप्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
“घटना घडल्याच्या पहिल्याच दिवशी मी स्वतः पोलीस आयुक्तांना फोन करून या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे झाला पाहिजे, असे सांगितले. कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
तपास यंत्रणेवर दबाव आणण्याऐवजी पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे आणि जनतेनेही संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत, पीडित कुटुंबाला न्याय मिळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत शिंदेंची नाराजी
ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बाहेरून येणाऱ्या काही लोकांकडून ठाणेकरांना त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जाळपोळ करणे, महामार्ग बंद करणे, नौपाडा परिसरात पोलिसांवर दगडफेक होणे आणि त्यात पोलिस जखमी होणे, अशा घटनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ठाणेकरांच्या शांततेला धक्का लागू दिला जाणार नाही. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना कायमच युतीधर्माचे पालन करते
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या भूमिकेबाबतही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. शिवसेना नेहमीच युतीधर्माचे पालन करते आणि युतीधर्म पाळला गेला पाहिजे, ही पक्षाची भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
युतीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्या, तरी या निवडणुकीत शिवसेनेने युतीधर्माचे पालन केले असल्याचे शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.