निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज युतीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. दरम्यान आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, आज एक महत्त्वाची घोषणा अपेक्षित आहे. शिवसेना शिंदे गटात इतर पक्षातील नाराज नेत्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. मतांची जुळवाजुळव आणि आघाड्या मजबूत करण्यासाठी शिंदे गट मनसेसह इतर लहान पक्षांशी पडद्यामागे चर्चा करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना सर्व पक्ष आपली ताकद आजमावत आहेत. शिंदे यांनी आणखी एका पक्षाला सोबत घेतल्याची माहिती आहे.