प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्र

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगीतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिरूर तालुक्याने एक गुणी कलावंत गमावला आहे.

हरीभाऊ पवार हे सनई वादनातील एक मान्यवर नाव म्हणून ओळखले जात होते. ‘हरि -नाथा ‘ या दोन भांवाच्या नावाने त्यांच्या ताफ्याची ख्याती अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वदूर पसरली होती. त्यांच्या सनईच्या सुरांनी असंख्य विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक समारंभ भारावून गेले होते. त्यांच्या वादनातील माधुर्य, शिस्त आणि पारंपरिकतेची जपणूक यामुळे त्यांना रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळाले होते.

पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या ताफ्याला मोठी मागणी होती. लग्नकार्य, यात्रा असो वा मोठे धार्मिक उत्सव—हरीभाऊंच्या सनईशिवाय कार्यक्रम अपूर्ण असल्याची भावना आयोजकांमध्ये होती. त्यांच्या सुरेल सनईमुळे अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण अधिक संस्मरणीय बनले.

साधी राहणी आणि उच्च कलात्मकता ही त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या सुरेल सनईच्या तालावार अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे.त्यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण संगीतप्रेमी समाजाचा मोठा आधार हरपला आहे. विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून “सनईचा एक सुरेल आवाज कायमचा थांबला” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.