अजितदादा पवार विमान दुर्घटनेवर नवे संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला ‘हिप्नोटाइज पायलट’चा अँगल

महाराष्ट्र

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेवर राज्यातील राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. मंगळवारी आमदार रोहित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात आणखी एक धक्कादायक संशयाचा अँगल उपस्थित केला आहे.

अमोल मिटकरी यांनी पायलटला हिप्नोटाइज करून विमान उडवण्यासाठी पाठवण्यात आले होते का? असा थेट सवाल उपस्थित केला. अपघाताच्या वेळी पायलटने MAYDAY कॉल न देणं, तसेच टेकऑफनंतर काही वेळातच पुणे गाठण्याची संधी असूनही तसा प्रयत्न न झाल्याने संशय बळावल्याचं त्यांनी सांगितलं.

VSR कंपनीवर गंभीर प्रश्नचिन्ह

मिटकरी यांनी संबंधित VSR विमान कंपनीवरही संशय व्यक्त केला.

VSR कंपनीचे पायलट दोन वेळा बदलण्यात आले

कंपनीवर यापूर्वीच काही काळासाठी बंदी होती

तेच विमान 28 तारखेला अजितदादांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं

डिसेंबर 2025 मध्ये कंपनीने प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला

या पार्श्वभूमीवर, पायलटला आमिष दाखवण्यात आलं होतं का किंवा मानसिक प्रभावाखाली ठेवण्यात आलं होतं का, याचा सखोल तपास होणं आवश्यक असल्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. या भेटीत ते सर्व संशयास्पद बाबी मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

रोहित पवारांची पत्रकार परिषद महत्त्वाची

अजितदादा पवार यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार मंगळवारी पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे.“त्यांच्याकडे असलेले पुरावे आणि माहिती जनतेसमोर मांडली जाईल, अशी अपेक्षा आहे,” असं मत मिटकरी यांनी व्यक्त केलं.

पक्षाच्या नेतृत्वाबाबतही स्पष्ट भूमिका

यावेळी अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वावरही भूमिका स्पष्ट केली.“अजितदादांनंतर त्या जागेवर सुनेत्रा वहिनींचाच अधिकार आहे. त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसच, अजितदादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन कुणीही प्रस्तावांची भाषा करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.