मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत नेतृत्वावर थेट टीका केली.
“मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. रणनीतीचा अभाव आणि संघटनात्मक कमकुवतपणा स्पष्ट दिसतो. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाड यांनी पद सोडावे,” असे जगताप यांनी सांगितले.
माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने पक्षाला बळ मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र निकालानंतरची परिस्थिती पाहता ती अपेक्षा फेल ठरल्याचे चित्र आहे.