हत्या की आत्महत्या! MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू

क्राईम महाराष्ट्र

बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत २०१२ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले, इंग्रजी व्याकरणाचे प्रसिद्ध लेखक व राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने आज सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र काही तासांतच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक तपासात ज्या कारमध्ये मृतदेह सापडला त्या कारमध्ये तसेच गाडीच्या खाली कोळसे असलेली मडकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत संशयास्पद मानली जात असून मृत्यूच्या कारणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की घातपात करण्यात आला, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सचिन जाधव हे अत्यंत हुशार, अभ्यासू व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी इंग्रजी व्याकरणावर आधारित अनेक पुस्तके लिहिली असून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे प्रशासकीय वर्तुळात तसेच विद्यार्थी व वाचकांमध्ये शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलीस सखोल तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. मृत्यूमागील सत्य लवकरात लवकर समोर यावे, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलीस सखोल तपास करत असून घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. मृत्यूमागचे सत्य लवकरात लवकर समोर यावे, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांकडून होत आहे. सध्या तरी हा मृत्यू एक गूढ बनला असून पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.