आजपासून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा अजितदादा पवारांच्या हाती; दादांच्या प्रतिमेसमोर भावूक क्षण

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याआधी त्यांनी सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत नतमस्तक झाल्या.

सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमी येथील दर्शनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आशीर्वाद घेतले. प्रतिमेला अभिवादन करताना त्या भावूक झाल्याचे दृश्य उपस्थितांना पाहायला मिळाले.

यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात दाखल होत उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ, युवा नेते पार्थ पवार, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यासह अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना सुनेत्रा पवार यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी आणि युवकांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या या पदभार स्वीकारण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र दिसून आले.