मुंबई: भाषाविषयावर आंदोलन करणं हा आजार असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत “भाषेच्या प्रश्नात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नका,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषेबाबत आग्रही भूमिका घेणं आणि आंदोलन करणं हा आजार असल्याचं विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये भागवतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “भाषावार प्रांतरचना का झाली याचा इतिहास भागवतांना माहीत असायलाच हवा. भाषेप्रती आणि प्रांताप्रती असलेलं प्रेम जर आजार असेल, तर हा आजार देशातील बहुसंख्य राज्यांत आहे.” दक्षिण भारतापासून पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरातपर्यंत भाषिक अस्मिता तीव्र असल्याचं त्यांनी नमूद केलं.
परप्रांतीयांकडून स्थानिक भाषा व संस्कृतीचा अवमान केला जातो, तेव्हा स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि त्यातून उद्रेक होतो. “यालाच आजार म्हणायचं का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधील लोकांविरोधात झालेल्या घटनांवेळी समरसतेचे धडे का दिले गेले नाहीत, असा थेट प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला.
भाजप आणि संघावर अप्रत्यक्ष राजकारण करत असल्याचा आरोप करताना राज ठाकरे म्हणाले, “स्वतःला अराजकीय म्हणवणाऱ्या संघाने या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल, तर हिंदी लादणाऱ्या सरकारला आधी जाब विचारा.”
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “हिंदूंवर हल्ला झाला तर आम्ही हिंदू म्हणून उभे राहूच. पण हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या तमाशावर, कावड यात्रांमधील बिभत्स प्रकारांवर, गोहत्येच्या राजकारणावर तुम्ही कधी बोलणार?” असा सवाल त्यांनी भागवतांना केला.
शेवटी राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले की, “मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच आमचं अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. भाषिक आणि प्रांतिक अस्मिता महाराष्ट्रात कायम राहणारच. हे आमचं स्वत्व आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र गरज पडेल तेव्हा त्वेषाने उभा राहील.”