गणेशोत्सव केवळ आरास-रोषणाईपुरता नको; समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. कार्यकर्त्यांनी गेल्या ३७ वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे गणेश दर्शन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राम गणेश गडकरी रंगायतन येथे झालेल्या या कार्यक्रमात शिंदे यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आनंद दिघे यांनी गणेश दर्शन स्पर्धेसोबतच गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. गणेश मंडळांना भेटी देताना ते सजावट, आरास, विषय तसेच त्यासाठी झालेला खर्च याची बारकाईने माहिती घेत असत. मंडळातील कार्यकर्त्यांनी सजावट स्वतः केली आहे का, यालाही ते विशेष महत्त्व देत असत, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. त्याच परंपरेला पुढे नेत आज गणेश मंडळांकडून सामाजिक, पर्यावरणीय आणि जनजागृतीपर विषयांवर देखावे साकारले जात आहेत. आरोग्य शिबिरे, रुग्णवाहिका सेवा, गरजूंना मदत तसेच संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम मंडळांकडून केले जाते. त्यामुळे गणेश मंडळे ही सामाजिक भान जपणारी केंद्रे बनत आहेत, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री असताना सण-उत्सवांवरील निर्बंध दूर करून गणेश मंडळांना परवानग्या आणि मंडप शुल्काबाबत सुलभता आणली. नागरिकांना आपली संस्कृती आणि परंपरा उत्साहाने साजरी करता यावी, हा त्यामागील उद्देश होता, असेही त्यांनी नमूद केले. आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेली दहीहंडीची परंपरा पुढे महाराष्ट्रभर पोहोचली. कोणतेही सत्तेचे पद नसतानाही सामाजिक कार्याच्या माध्यमातून दिघे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, असे शिंदे यांनी सांगितले.

गणेश दर्शन स्पर्धेमुळे गणेश मंडळांमधील तरुण कार्यकर्त्यांच्या नियोजनकौशल्याला, कल्पकतेला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळते. आर्किटेक्चर, इंजिनिअरिंगसह विविध कौशल्यांना यातून वाव मिळत असल्याने गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असेही शिंदे म्हणाले.

पुरस्कार विजेत्या मंडळांचे अभिनंदन करताना यंदा बक्षीस न मिळालेल्या मंडळांनी निरुत्साहित न होता जिद्द आणि चिकाटीने पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उत्सव साजरा करताना इतरांना त्रास किंवा गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, अभिनेता अजिंक्य देव, प्रा. प्रदीप ढवळ, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक अनिल भोर यांच्यासह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत