मुंबई: महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा (Oral Healthcare) क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, परकीय थेट गुंतवणुकीसह (FDI) देशांतर्गत उद्योगांनाही चालना दिली जाईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी केले.
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत झालेल्या ‘महाराष्ट्र : मौखिक आरोग्य सेवा परिसंस्थेसाठी अग्रगण्य गुंतवणूक केंद्र’ या विषयावरील उद्योग गोलमेज परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भारतीय दंतचिकित्सा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज श्रीवास्तव, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे संयुक्त सचिव व धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष भोसले, मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांच्यासह देश-विदेशातील दंत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गवांदे यांनी दंत उपचारांसाठी विमा संरक्षणाचा विस्तार करण्याची गरज अधोरेखित करत इंडियन डेंटल असोसिएशनने खासगी विमा कंपन्यांशी समन्वय साधण्याचे आवाहन केले. दंत उपचारांना विमा संरक्षण मिळाल्यास नागरिकांचा उपचारांकडे कल वाढेल आणि उद्योगासाठी नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
दंत उद्योगासाठी आवश्यक कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत उद्योगाच्या गरजेनुसार तीन महिन्यांचे अल्पकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मैत्री’ पोर्टलमुळे उद्योगांना परवानग्या आणि मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे सांगत, दंत उद्योगाला स्वतंत्र उद्योग म्हणून प्रोत्साहन योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनने उद्योग विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. दंत उत्पादन क्षेत्रातील उत्पादन युनिट्स महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
परिषदेच्या प्रारंभी राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांनी महाराष्ट्रात क्लिनिकल सेवा, संशोधन, शिक्षण, उत्पादन आणि डेंटल टुरिझमचा समावेश असलेली सर्वसमावेशक मौखिक आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या परिषदेत हेलिऑन–सेन्सोडाईन, कोलगेट-पामोलिव्ह, डेंट्सप्लाय सिरोना इंडिया, शोफू डेंटल इंडिया, डेंटल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया, पिडिलाइट विझडेंट, प्रिव्हेस्ट डेनप्रो, सेलाडेंट आदी आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यांनी महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरणाचे कौतुक करत राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे सांगितले.