मुंबई: नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी महिला आघाडीने केली. तसेच अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी आरोपींना कठोर आणि तातडीने शिक्षा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, नसरापूर येथील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. जनभावनेचा आदर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास करून अवघ्या १५ दिवसांत १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आणि न्यायालयाने ५५ दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. महिलांवरील गंभीर गुन्ह्यात इतक्या वेगाने शिक्षा सुनावल्याचे हे राज्यातील पहिले प्रकरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला असून अशा गुन्ह्यांमध्येही तातडीने न्याय मिळू शकतो, असा संदेश समाजात गेला आहे. यासाठी पुणे ग्रामीण पोलीस, न्यायव्यवस्था तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना शीतल म्हात्रे यांनी, “या निर्णयामुळे समाधान वाटत असले तरी त्या चिमुकलीच्या आईचे दुःख पाहून एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत,” अशी भावना व्यक्त केली. अशा गुन्ह्यांतील दोषींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात धाक निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.शिवसेना प्रवक्त्या सुशिबेन शहा यांनी सांगितले की, फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घेण्याचा निर्णय या प्रकरणात महत्त्वाचा ठरला. पुढे उच्च न्यायालयात सुनावणी झाली तरी आरोपीला फाशीची शिक्षा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य विधानसभेत मंजूर झालेला शक्ती कायदा केंद्र सरकारकडून लवकरच अंतिम मंजुरी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या निर्णयाचे शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, सुशिबेन शहा, उपनेत्या संध्या वढावकर, सुवर्णा करंजे, कला शिंदे, ज्येष्ठ नगरसेविका तथा बेस्टच्या माजी अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, राजुल पटेल तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.