मी संस्थानिकांचा, राजा महाराजांचा मुलगा नाही; जयकुमार गोरे

महाराष्ट्र

सातारा: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसाच ते देखील करत आहेत. मात्र, कोणी असुरक्षित वाटून घेण्याचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आले आहे ते निवडणूक आयोग व तुम्हालाही माहीत आहे.

मी संस्थानिकांचा मुलगा नाही, मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो नाही, सामान्य शेतकर्‍याचा पोरगा म्हणून मी राजकारणात आलो असल्याचा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ना. मकरंद पाटील यांना लगावला.

भाजपचे नेते ना. जयकुमार गोरे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ना. मकरंद पाटील यांच्यात चांगलेच बिनसले आहे. ना. मकरंद पाटील यांनी दहिवडीतील कार्यक्रमात ना. गोरे यांच्यावर टीका केली होती. बुधवारी ना. गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ना. मकरंद पाटील यांना प्रतिटोला लगावला आहे.

ना. गोरे म्हणाले, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. या पक्षाचा कार्यकर्ता ज्या-ज्या ठिकाणी आहे त्या-त्या ठिकाणी त्याला बळ देण्यासाठी मला जावे लागेल आणि मी जाणार. ते त्यांचा पक्ष वाढवतात; मी माझा पक्ष वाढवतोय. कोणी कुणाला असुरक्षित वाटून घ्यायचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आलंय ते निवडणूक आयोगाला व तुम्हालाही माहिती आहे. मी पण पन्नास हजार मतांनी निवडून आलो आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष देत नाही. मी कोणा संस्थानिकाचा किंवा राजा महाराजाचा मुलगा नाही.

मी सर्व सामान्य शेतकर्‍याच्या पोटी जन्माला आलो आहे. 2009, 2014, 2019 अशा निवडणुका मी लढवून जिंकलो आहे. प्रस्थापित व्यवस्थेशी मी संघर्ष केला आहे. हा संघर्ष कायम ठेवून राज्यात काम करतो आहे हे सर्वांना ज्ञात आहे. मकरंद पाटलांनी ज्यांचा प्रवेश घडवून आणला ते पूर्वीपासूनच माझ्या विरोधात आहेत. केवळ दाखवायचं म्हणून हा पक्षप्रवेश झाला आहे का याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करावे. मी यापूर्वी 50 हजार मतांनी निवडून आलो आहे. कुणी सांगायचे कारण नाही. महायुतीमध्ये सगळं अलबेल नाही का असे विचारले असता सगळे व्यवस्थित आहे, असे देखील ना. गोरे म्हणाले.