आई-वडिलांना सांभाळले नाही तर सरळ तुरुंगात जाल; जाणून घ्या काय म्हणतो कायदा…

महाराष्ट्र

औरंगाबाद: आजच्या काळात वृद्ध आई-वडील घरात असणे हे त्यांच्या मुलांना अडचणीचे वाटते. त्यामुळे मुले त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विसरत चालले आहेत. पण, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडल्यास तुरूंगवारी करावी लागणार आहे.

दंड व शिक्षा

ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे व त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे, यासाठी ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पाल्यांना अथवा ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारी असलेल्या व्यक्तींना ‘आई – वडील व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम २००७’ च्या कलम २४ नुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा ५००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कायद्यातील तरतूद

जे ज्येष्ठ नागरिक स्वत:चे पलानपोषण करण्यास समर्थ नाही ते त्यांच्या मुलांकडून पोटगी मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’च्या कलम १२५ नुसार ज्येष्ठांना त्यांच्या मुलांकडून स्वत:च्या पालनपोषणासाठी पोटगी मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पोटगीची ही रक्कम मुलांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांचे उत्पन्न व त्याच्या परिवाराचा खर्च विचारात घेऊन न्यायालय पोटगीची रक्कम ठरवीत असते.

हे करू शकतात पोटगीसाठी अर्ज…

या कायद्याखाली स्वत: ज्येष्ठ नागरिक अथवा पालक, जर ते असमर्थ असतील तर त्यांनी अधिकार दिलेली व्यक्ती किंवा संस्था अर्ज करू शकते. अथवा न्यायाधिकरण स्वत: त्याची दखल घेऊ शकते. मुलगा किंवा नातेवाइकांनी न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या पालनपोषणासाठी ठरवून दिलेली रक्कम अदा केली नाही तर न्यायाधिकरण आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्वत: फौजदारी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करते.