लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रचारकी छाप मारून दुर्लक्ष

महाराष्ट्र

मुंबई: “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे याचे साहित्य प्रचारकी नव्हते,तेअभिजात साहित्य होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी जीवनमूल्ये आणि जगण्यातले वास्तव मांडले.शहरी, ग्रामीण जीवनातील व्यथा मांडत त्याला एक आयाम दिला, मात्र त्यांच्या साहित्यावर प्रचारकीचा शिक्का मारुन, समीक्षकांनी ते दुर्लक्षित केले असल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयः शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांतर्गत ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, साहित्यिक योगदान’ यावर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयांच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात,नुकतेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मुणगेकर बोलत होते.

डाॅ. रणधीर शिंदे यांनी सांगितले की,”अण्णाभाऊ साठे यांचे वाङ्मय हे मानवतावादी परंपरेतील महत्त्वाचे साहित्य आहे. कष्टकरी, श्रमिक व वंचित जनतेचे भावविश्व , दुःख व संघर्षाच्या कथा त्यांनी लिहिल्या. १९५६ ते१९५८ या कालावधीतील कथांवर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो ‘सोन्याचा मणी’, ‘सापळा’, ‘शपथ’ या काही उल्लेखनीय कथा. त्यांच्या साहित्यातून जातिव्यवस्थेचा तसेच मार्क्स व आंबेडकरवादाचा सखोल असा सृजनशील थेट आविष्कार दिसतो. परिघावरील वंचितांचे जग त्यांनी मराठी वाङ्मयात आणले.

आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी, लढे समजून घ्यायला अण्णा भाऊं साठेंचे साहित्य दिशादर्शक आहे. एकभाषिक महाराष्ट्राचे स्वप्न त्यानी पाहिले. यांचे विचारविश्व व वाङ्मय नव्या पिढीला निश्चितच मानतावादी प्रेरणा देणारे आहे. ”

लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. प्रकाश खांडगे यांनी लोकशाहीर म्हणून अण्णा भाऊ साठे यांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगून, “आहे रे व नाही रे गटाचे शोषण यावर त्यांचे साहित्य भाष्य करते. बहुप्रसवा प्रतिभा, जीवनस्पर्शी साहित्य व समाजकेंद्रित लावणी हे अण्णा भाऊ साठे यांचे वैशिष्ट्य. लोकनाट्याची संकल्पना त्यांनी मांडली.

सामाजिक विसंगतीवर कोरडे ओढले व पाखंडी विचारांना थारा दिला नाही. शोषणमुक्त समाज आणि परिवर्तनशील समाज हे अण्णा भाऊ साठे यांचे ईप्सित होते जे त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे व लोकनाट्य यातून सर्वसामान्यांच्या संघर्षाचे दर्शन घडते. त्यांच्या घरची तमाशाची परंपरा होती त्यामुळे तमाशाचा पारंपरिक बाज म्हणजे गणगवळण, बतावणी, लावणी, रंगबाजी फारसा वग याचे पूर्ण आकलन त्यांना होते. त्यामुळे त्यांनी तमाशाचा मूळ आकृतिबंध स्वीकारताना परंपरेच्या चौकटीत क्रांतिदर्शी प्रतिमा गोवल्या. त्यांचे पोवाडे व्यक्तिप्रधान नव्हते तर ते प्रसंग विशेषी आणि सामाजिक समतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित होते.”

प्रा. शिवराज गोपाळे यानी कवी कालिदास यांच्या मेघदूत आणि अण्णाभाऊ साठे लिखित माझी मैना गावाकडे गावावर राहिली यावर तुलनात्मक बोलताना सागितले की, “संस्कृत साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा लेखक कालिदास, मेघदूत मधून यक्ष, त्यांची पत्नी यांच्यातील विरह, यक्षाने मेघामार्फत पाठवलेला संदेश येतो.

अण्णा भाऊंच्या साहित्यात तत्कालीन सामाजिक परिस्थितीतून अठराविश्व दारिद्र्य असलेला नायक उत्पन्नाचे साधन शोधण्यासाठी मुंबईत येतो. त्याला पत्नीची होणारी आठवण तिचीस्वप्नं पूर्ण करण्याची धडपड ,पण तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु होते नि ते या चळवळीचा एक भाग होतात. संयुक्त महाराष्ट्र होतो पण कर्नाटकातील निपाणी ,बेळगाव ,कारवार भालकी बिदर हा भाग आजही महाराष्ट्रात येऊ शकला नाही याची खंत ते व्यक्त करतात.

त्यामुळे कालिदासाच्या मेघदूतातून आलेला विरह हा कल्पित प्रतिभेच्या अंगाने लिहिला गेला आहेत तर अण्णा भाऊंचा माझी मैना गावावर राहिली या लावणीतील विरह हा वास्तव जीवनातील व्यथा अधोरेखित करतो. अण्णाभाऊ कल्पनेच्या भावविश्वास न रमता आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीकडे किती डोळसपणे व व्यापकतेने पाहत याचे दर्शन त्यांच्या ‘माझी मैना गावावर ‘राहिली या अजरामर लावणीतून आपल्याला दिसून येते.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. गणेश चंदनशिवे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे कवन भारदस्त आवाजात सादर केले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले.