अवैध व्यवसायांना पोलिसांच संरक्षण; अंबादास दानवे

महाराष्ट्र

मुंबई: संभाजीनगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून शहरात ७० टक्के गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. या अवैध  व्यवसायांना पोलिसांच संरक्षण आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

संभाजीनगरमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाकडे अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच अवैध व्यवसायधारकांकडून कशाप्रकारे वसुली केली जाते त्याची फोन नंबरसहित यादीच दानवे यांनी सभापती यांच्याकडे सुपूर्द केली. ज्या भागात जुगार सुरू आहे तेथे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. शहरात जुगाराचे पैसे पाठविण्यासाठी ठिक ठिकाणी क्यू आर कोड लावले असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली.

तसेच भाजपचा डोंगावकर नावाचा कार्यकर्ता लॉटरी चालवितो, या अवैध व्यवसायाला पोलीस आयुक्तालय कार्यालयातून संरक्षण दिल जातं. जुगार, मुरूम, वाळू तस्करी या गुन्हेगारांना गुन्हे निहाय पोलीस स्टेशनमध्ये बोलावून एक पोलीस अधिकारी पैसे वाढवून देण्यास सांगतो. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. यावर राज्याचे गृहमंत्री यांनी उत्तर देताना म्हटले की, विरोधी पक्षनेते यांनी सादर केलेली यादी मला पाठवा, त्यातील फोन नंबर तपासले जातील. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संपूर्ण चौकशी केली जाईल.