शाळांना यंदा ४१ दिवसांची उन्हाळा सुटी! उन्हामुळे आजपासून शाळांची वेळ बदलणार…

महाराष्ट्र

औरंगाबाद: उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात (साडेसात ते साडेअकरा) भरणार आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वर्षातील ३६५ दिवसांपैकी ७६ दिवस पगारी सुट्ट्या (रविवार वगळून) असतात. त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो.

आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. त्यानंतर १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून सर्वच शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे. तत्पूर्वी, सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने दरवर्षीप्रमाणे १ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ बदलण्यात आली असून शाळा सकाळच्या सत्रात भरतील. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वीच सर्व मुले घरी जातील, अशी शाळेची वेळ असणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचे पत्र सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवले आहेत. उद्यापासून (बुधवार) शाळांना सुटी लागेपर्यंत शाळांची वेळ आता सकाळचीच असणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

१२ जूनपासून सुरु होणार शाळा

दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरवात साधारणतः: १५ जूनपासून शाळा सुरु होते. पण यंदा ११ जूनपर्यंतच उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंदच होत्या. त्यामुळे बहुतेक मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याची वस्तुस्थिती आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने २२ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे संपादणूक मूल्यमापन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यानुसार कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे उन्हाळा सुटीत त्यादृष्टीने नियोजन केले जावू शकते.

२ मेपासून उन्हाळा सुटी

उन्हाचा तडाखा वाढला असल्याने शाळांमधील चिमुकल्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा उद्यापासून (बुधवार) सकाळच्या सत्रात भरतील. सकाळी साडेसात ते साडेअकरा अशी शाळेची वेळ असणार आहे. २ मेपासून जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना उन्हाळा सुटी असेल.