sheetal kardekar

पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार शीतल करदेकर यांना जाहीर

महाराष्ट्र

पुणे: आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘हास्य-विनोद आनंद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. बाबूराव कानडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त वसंतराव कुलकर्णी, कमलाकर बोकील, सल्लागार डॉ. आनंद देशपांडे आदी उपस्थित होते.

या महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ११) विसुभाऊ बापट यांच्या हस्ते सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यानंतर ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी इंद्रधनू हा कार्यक्रम सादर होणार आहे. तर, १३ ऑगस्टला न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. या सोहळ्यात आचार्य अत्रे यांच्या नावे कवी, विडंबनकार, विनोदी लेखक, वक्ते, व्यंगचित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, उद्योगपती आदींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी धाडसी पत्रकार शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.