ओतूर: जुन्नर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांदरम्यान प्रचाराच्या गाड्यांचा गोंगाट आणि हालचालींमुळे बिबटे लोकवस्तीपासून दूर राहत असल्याचे चित्र होते. त्यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना काही काळ आढळून येत नव्हत्या. मात्र निवडणुका संपताच दैनंदिन जीवन पूर्ववत झाले असून ओतूर (ता. जुन्नर) परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा वाढू लागली आहे.
ओतूर गावच्या हद्दीतील आवळी शिवारात बुधवारी (ता. ११) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भरदिवसा बिबट्याने एका तरुण शेतकऱ्यावर हल्ला केला. या घटनेमुळे ओतूरसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धनंजय नारायण डुंबरे (वय ३२) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, ते कांद्याच्या शेतात पाणी भरत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या हात, पाय आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. डुंबरे यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
येथे डॉ. विष्णवी ठिकेकर, डॉ. प्रशांत गोरे आणि डॉ. अमोल बागर यांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारांसाठी आणि बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी त्यांना नारायणगाव येथे पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे, वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित परिसरात गस्त वाढविण्यात येणार असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, ओतूर व परिसरात उसतोडणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बिबटे सैरभैर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.