राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल…

महाराष्ट्र

मुंबई: भारतीय ऑलिम्पिक संघ व गुजरात ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने देशाची प्रतिष्ठित ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरात येथे (दि. २७) सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या 8 क्रमांकाचे महाराष्ट्रातील पुरुष व महिला संघ एकुण ३४ क्रीडा प्रकारात असे ८०० जणांचे पथक या स्पर्धेसाठी पाठविणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असल्यामुळे गुजरातमध्ये होणाऱ्या ३६ व्या आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधिक पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळेल असा आत्मविश्वास महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या तयारीच्या संदर्भात विविध खेळांच्या राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

ranjangaon-mutadwar-darshan
ranjangaon-mutadwar-darshan

या बैठकीस मार्गदर्शन करताना शिरगावकर म्हणाले,” माझा संघ माझी जबाबदारी हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवीत प्रत्येक खेळाच्या संघटनांनी आपल्या खेळाडूंची उत्तम रीतीने तयारी करावी. खेळाडूंच्या तयारीसाठी राज्य शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न ठेवता संघटनांनी या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना अधिकाधिक पदके कशी मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करावे.

शिरगावकर पुढे म्हणाले की, ज्या संघटनांनी आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावे दिलेली नाहीत त्यांनी लवकरात लवकर ही नावे सादर करावीत.

या बैठकीत शिरगावकर यांनी यापूर्वी सुरु झालेल्या काही संघांच्या शिबिरांचा आणि संघ निवडीबाबत घेण्यात आलेल्या चाचण्यांचाही आढावा घेतला. त्यावेळी खेळाडू व अन्य सपोर्ट स्टाफची यादी, प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य व सुविधा इत्यादी सर्व तपशील महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेकडे द्यावा, असे सांगितले. बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत ज्यांना शिबिर आयोजित करायचे आहे त्यांनी या संदर्भातील सर्व माहिती संबंधित शासकीय क्रीडाधिकाऱ्यांकडे द्यावी म्हणजे त्यानुसार या क्रीडा नगरीत व्यवस्था करणे सोयीचे होईल.

या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले की, बालेवाडीत शिबिरासाठी कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत मात्र क्रीडा संघटनांनी लवकरात लवकर त्यांना खेळाडूंची नावे व अन्य माहिती द्यावी कारण क्रीडा नगरीत नियमितपणे अनेक खेळांच्या स्पर्धा व सराव शिबिर सुरु असतात. तसेच येथे प्रशिक्षण घेणारे खेळाडू वसतिगृहातही राहत असतात. राज्यात अन्य ठिकाणी शासनाच्या ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आहेत तेथेही स्पर्धा पूर्व शिबिर आयोजित करणे शक्य आहे. अशा ठिकाणी संबंधित खेळांच्या संघटनांनी शिबिर आयोजित केल्यास तेथेही शासनाचे सहकार्य मिळेल.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुख्य पथक प्रमुख व ज्येष्ठ बॅडमिंटन संघटक प्रदीप गंधे यांनी या बैठकीस मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खेळाडू केव्हां केव्हां आणि कोठून जाणार आहेत याचा तपशील महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेकडे द्यावा म्हणजे त्यानुसार त्यांची प्रवास व्यवस्था करणे सोयीचे होईल.

उपपथक प्रमुख ॲड. प्रशांत देशपांडे यांनी सांगितले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संदर्भात जीन नियमावली व आचारसंहिता तयार केली जाणार आहे त्यानुसार महाराष्ट्राच्या संघांमधील खेळाडून करता नियमावली व आचारसंहिता तयार केली जाईल. त्यानुसार खेळाडू व व संघांतील अन्य पदाधिकाऱ्यांनी या नियमावली व आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

शासनाच्या वतीने नवनाथ फरताडे, अविनाश सोलवट यांनीही या बैठकीस मार्गदर्शन केले. या बैठकीत विविध खेळांच्या राज्य संघटनांचे चाळीसहून अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते.