राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेला मोठी चालना; १,७५६ नवीन १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; एकनाथ शिंदेंक

महाराष्ट्र

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत नवीन १,७५६ रुग्णवाहिका शासकीय सेवेत दाखल होणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या रुग्णवाहिकांची पाहणी करून त्यातील अत्याधुनिक सुविधांची माहिती घेतली. तसेच रुग्णवाहिका लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्याचे निर्देश दिले.

या प्रकल्पात ALS (अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट) आणि BLS (बेसिक लाइफ सपोर्ट) रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यामध्ये २५५ जीवनरक्षक ALS, १,२०४ मूलभूत जीवनरक्षक रुग्णवाहिका, ३६ नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिका, १६६ दुचाकी रुग्णवाहिका, १५ नदी बोट रुग्णवाहिका आणि १० समुद्री बोट रुग्णवाहिकांचा समावेश आहे.

संपूर्ण भारतीय बनावटीच्या या रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्शन पंप आणि ऑक्सिजन वितरण प्रणाली यांचा समावेश आहे. तसेच रुग्णवाहिकेतून रुग्णालयातील डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णवाहिकांची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी काही आवश्यक बदल आणि सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, सुमित फेसिलिटीजचे संचालक सुमित साळुंखे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत